मुंबई

विधानपरिषदेत नीलम गोऱ्हे यांची एकमतानं उपसभापतीपदी निवड

महाविकास आघाडीकडून उपसभापतीपदासाठी नीलम गोऱ्हे यांच्या नावाची निवड करण्यात आली होती. तर भाजपाकडून भाई गिरकर यांच्या नावाची निवड करण्यात आली होती. दरम्यान, विधानपरिषदेत नीलम गोऱ्हे यांची एकमतानं उपसभापतीपदी निवड करण्यात आली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर एकमतानं नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली. दरम्यान, उपसभापती निवडणुकीच्या वेळी भाजपानं सभात्याग केला.

निवडणुकीपूर्वी भाजपानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, याबाबतचा निकाल गुरूवारी न्यायालय देणार असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली. तसंच या ठिकाणी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक घेऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली. यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं म्हटलं. तसंच यानंतर आवाजी मतदान घेण्यात आलं आणि नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी नियुक्ती करण्यात आली.

“न्यायालयानं आपल्याला बोलावलं नाही. न्यायालयानं निकालाबद्दल सांगितलं नाही. म्हणून हे मान्य करता येणार नाही. निवडणुकीचा प्रश्न नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. उच्च न्यायालयानं समन्स दिलं तर त्यावर आपण उत्तर देऊ,” असं सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यावेळी म्हणाले. त्यांच्या नियुक्तीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं. “महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये नीलम गोऱ्हे या स्वतः धावून जातात हे आपण पाहिले आहे. त्यांची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांना शुभेच्छा देताना म्हणाले.

भाजपाकडून विधानपरिषदेचे सदस्य भाई गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं. सध्या करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. परंतु या अधिवेशनादरम्यान अनेक सदस्य अनुपस्थित आहेत. गोपीचंद पडळकर, परिणय फुके, प्रविण पोटे या परिषदेच्या सदस्यांना करोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीची घाई का केली जात आहे? असा सवाल दरेकर यांनी केला. भाजपानं विधिमंडळात याबाबत नेत्यांची बैठक बोलावली होती. तसंच याबाबत उच्च न्यायालयात त्यांनी दाद मागितली होती.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x