शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राऊत यांच्याव्यतिरिक्त अन्य १० जणांचीही प्रवक्ते म्हणून शिवसेनेनं निवड केली आहे. यामध्ये काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना संजय राऊत यांनी सतत शिवसेनेची भूमिका मांडत भाजपावर हल्लाबोल केला होता. शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनाही संधी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली.
शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून खासदार संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अन्य सदस्य प्रवक्त्यांमध्ये खासदार अरविंद सावंत, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार निलम गोऱ्हे यांची निवड करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त महापौर किशोरी पेडणेकर, आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचीही प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.