पुणे

खेळ हा सर्वसामान्‍यांच्‍या जीवनशैलीचा भाग व्‍हायला हवा – केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजिजू

पुणे, दिनांक 18-

खेळ हा सर्वसामान्‍यांच्‍या जीवनशैलीचा भाग व्‍हायला हवा, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा कार्यक्रम आणि युवा मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केले.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्‍ये खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचे लोकार्पण झाले. त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री आदिती तटकरे, पिंपरी-चिंचवडच्‍या महापौर उषा ढोरे, खासदार गिरीश बापट, क्रीडा आयुक्‍त ओम प्रकाश बकोरिया यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्‍यमंत्री किरेन रिजीजू म्‍हणाले, देशात क्रीडा संस्‍कृती पुरातन कालापासून आहे. तिची जोपासना होण्‍याची गरज आहे. खेळ हा आपल्‍या जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे. देशात आणि राज्‍यातही क्रिडा क्षेत्राची वाढ होण्‍यासाठी केंद्र शासनाच्‍यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आजी आणि माजी खेळाडूंना आर्थिक मदत करणे, हाही त्‍या प्रयत्‍नांचा एक भाग आहे. महाराष्‍ट्राला क्रीडा क्षेत्रासाठी केंद्र शासन सर्वतोपरी मदत करेल,असेही त्‍यांनी सांगितले.

राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्‍हणाले, राज्‍य शासन विद्यार्थ्‍यांमध्‍ये खेळांची आवड निर्माण व्‍हावी, म्‍हणून व्‍यापक प्रयत्‍न करत आहे. खेळ आणि खेळाडू यांच्‍या पाठीशी राज्‍य शासन खंबीरपणे उभे आहे. केंद्र शासनाने क्रीडा क्षेत्रासाठी भरीव मदत करावी, असे आवाहनही त्‍यांनी केले.

राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी राज्‍य शासन क्रीडा क्षेत्रात राबवत असलेल्‍या योजनांची माहिती दिली. पुण्‍यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलाने क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रभावशाली भूमिका बजावलेली आहे. १५१ एकर परिसरात वसलेल्या या क्रीडा संकुलाची सुरुवात १९९४ साली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने झाली, त्यानंतर सन २००८ मध्ये या संकुलातील क्रीडा सुविधांमध्ये भर घालून व अद्ययावत करुन, याठिकाणी तिसऱ्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याशिवाय या क्रीडा संकुलामध्ये ब्राझिलने विजेतेपद संपादन केलेल्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ गट पुरुष जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, ग्रॅण्ड प्रिक्स, टेबल-टेनिस सर्किट स्पर्धा, आशियाई कॅडेट कुस्ती स्पर्धा, आशियाई बास्केटबॉल स्पर्धा (१६ वर्षाखालील मुली) आणि २०१९ मध्ये दुस-या खेलो इंडिया स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आल्‍याचेही राज्‍यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी तर आभार प्रदर्शन उपसंचालक सुधीर मोरे यांनी केले. यावेळी अंजली भागवत, राही सरनोबत, तेजस्‍वीनी सावंत, स्‍वरुप नारकर, विजय संतान, अनिल चोरमले आदींसह क्रीडापटू उपस्थित होते.

पार्श्‍वभूमी- भारताच्या क्रीडा संस्कृतीत वाढ करणे, त्याद्वारे क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने भारतीय खेळ प्राधिकरणासह खेलो इंडिया ही योजना अंमलात आणलेली आहे. या योजनेद्वारे मुलांचा व तरुणांचा समग्र विकास, समुदाय विकास, सामाजिक एकता, लिंग समानता, निरोगी जीवनशैली, राष्ट्राभिमान आणि खेळाच्या विकासाशी संबंधित आर्थिक संधीद्वारे व खेळाच्या सामर्थ्यामुळे लोकसंख्येला याचा लाभ होऊ शकेल, हे उद्दिष्‍ट साधण्याचे ठरविलेले आहे. खेलो इंडिया योजनेंतर्गत १ ऑक्टोबर, २०१७ च्या अधिसूचनेद्वारे भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने राज्यस्तरीय खेलो इंडिया केंद्रे अधिसूचित केलेली आहेत. याही पुढे जाऊन राज्यस्तरीय खेलो इंडिया केंद्र योजनेंतर्गत राज्य व केंद्र शासित प्रदेशातील पायाभूत क्रीडा सुविधांचा योग्य व इष्टतम वापर करण्याच्या दृष्टिने “खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र” स्थापन करण्याचे प्रस्तावित केलेले आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने “खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र” या योजनेसाठी ॲथलेटिक्स, सायकलिंग आणि शुटींग या खेळांची सन २०२४ व २०२८ चे ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेवून निवड केलेली असून, या खेळांमध्ये “खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र” राज्यासाठी उपलब्ध करुन देण्याबाबत प्रस्ताव केंद्र शासनास सादर केला. हा प्रस्ताव शिवछत्रपती क्रीडा संकुलातील उपलब्ध सुविधा पाहून केंद्र शासनाद्वारे मंजूर केला आहे. “खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र” हे राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत

चालविले जाणार असून, भारतीय खेळ प्राधिकरण या केंद्रासाठी क्रीडा विज्ञान केंद्र, क्रीडा मार्गदर्शन इत्‍यादी बाबींसाठी सहकार्य करणार आहे.

या केंद्रासाठी ॲथलेटिक्स, सायकलिंग व शुटींग या खेळासाठी प्रत्येकी ३० प्रमाणे ९० खेळाडूंना प्रवेश दिल्या जाईल, या खेळाडूंच्या निवास व भोजनाचा खर्च राज्य शासनामार्फत करण्यात येईल. या केंद्रासाठी केंद्र शासनामार्फत आवर्ती खर्चांतर्गत क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक क्रीडा मार्गदर्शक, स्पोर्टस् सायन्स सेंटरसाठी कर्मचारी वर्ग, खेळाडूंना क्रीडा गणवेश व क्रीडा विषयक वैयक्तिक साहित्य, आवश्यक क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अनावर्ती खर्चामध्ये केंद्र शासनामार्फत स्पोर्टस् मेडिसीन सेंटर उभारणी करणे व शुटींग खेळाचे टारगेट सिस्टीम यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. राज्य शासनास या केंद्रासाठी खेळाडूंच्या निवास व भोजन व्यवस्थेसाठीचा खर्च करावा लागणार आहे. या केंद्रासाठी केंद्र शासनामार्फत चार वर्षांसाठी आवर्ती खर्चासाठी ११ कोटी रुपये व अनावर्ती खर्चासाठी ५ कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x