पुणे

‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत मूल्यसाखळी वाढविण्याचा प्रयत्न करा-कृषी मंत्री दादाजी भुसे

पुणे : बाळासाहेब ठाकरे कृषी व्ययसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत (स्मार्ट) शेतकरी कंपन्यांनी महिला सभासदांना पूर्णतः सहभागी करून पारदर्शकपणे व्यवहार करावे आणि मूल्यसाखळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत अल्पबचत भवन येथे आयोजित अहमदनगर, पुणे व सोलापूर येथील प्रथम टप्प्यात मंजूर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाला कृषी आयुक्त तथा प्रकल्प संचालक धीरज कुमार उपस्थित होते.

श्री.भुसे म्हणाले, शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्य वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. शेतमालाची गुणवत्ता वाढविण्याचीदेखील गरज आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येत आहे. शेतकरी कंपन्यांनी तो यशस्वी केल्यास इतर शेतकऱ्यांनाही त्यातून प्रेरणा मिळेल. प्रकल्पातून मिळणारा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत जाईल याची दक्षता घ्यावी आणि प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले, एकेकाळी देशाला महाराष्ट्राने सहकाराची संकल्पना दिली. सहकार क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी सहकाराचे तत्व रुजवले आणि अनेक संस्था यशस्वीपणे उभ्या केल्या. याच धर्तीवर शेतकरी कंपनी स्थापित करून त्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी ‘स्मार्ट’ प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. शेतकरी संघटित झाले आणि प्रकल्पाची साखळी उभी राहिली तर मोठ्या उद्योजकांशी स्पर्धा होऊन शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो.

शेतकरी कंपनीच्या माध्यमातून नव्या कल्पना पुढे येत आहेत. बाजारात मागणीपेक्षा उपलब्धता जास्त झाली तर दर कमी होतात. अशावेळी साठवणूक करून दर वाढल्यावर बाजारात उपलब्ध केल्यास जास्त लाभ मिळतो. त्यासाठी साठवणूक सुविधा, प्रतवारी, शीतगृह, शेतमालावर प्रक्रिया, पॅकेजिंग आदी बाबींचा विचार या योजनेत केला आहे. पुढील वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे केले जाणार असल्याने कंपनीत ३० टक्के महिला संचालकांची अट ठेवण्यात आली आहे, असे श्री.भुसे यांनी सांगितले.

धीरज कुमार म्हणाले, प्रकल्पासाठी सुरुवातीस ५ हजार प्रस्ताव प्राप्त झाले, त्यापैकी ५०० प्रकल्पांची निवड पहिल्या टप्प्यात करण्यात आली. शेतकरी उत्पादक कंपन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. शेतकऱ्यांनी मूल्य साखळीची ओळख करून उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकरी संघटित झाल्यास त्याला जास्त लाभ मिळविता येईल.

उत्पादनाची गुणवत्ता चांगली असल्यास बाजार मिळणे शक्य होते. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. शासकीय मदतीसोबत शेतकरी कंपनीत पारदर्शकता आणि सर्वांचा समान सहभाग महत्वाचा आहे. राज्यातून अनेक यशस्वी शेतकरी कंपन्या तयार होण्यासाठी कृषी विभागातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

अतिरिक्त प्रकल्प संचालक दशरथ तांभाळे यांनी ‘स्मार्ट प्रकल्पाची ओळख व मूल्यसाखळी विकास’, आत्माचे संचालक किसान मुळे यांनी ‘स्मार्ट व प्रकल्प अहवाल तयार करणे’ आणि ‘स्मार्ट’ समन्वयक जीवन बुंदे यांनी प्रकल्पासंबंधी वारंवार विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे याबाबत मार्गदर्शन केले.

विभागीय सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेविषयी माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.

कार्यशाळेला ‘स्मार्ट’ प्रकल्पात सहभागी १११ संस्था आणि शेतकरी उत्पादक गटातील सदस्य, महिला प्रतिनिधी तसेच त्या संस्थांचे नोडल अधिकारी व खरेदीदार आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ठळक वैशिष्ठ्ये
* प्रत्येक शेतकरी कंपनीकडून एक महिला प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते, अशा ६० महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
*कार्यशाळेचे उद्घाटन करण्याचा मान मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांना दिला.
*स्वतःचे स्वागत स्वीकारण्याऐवजी भुसे यांनी प्रत्येकी दोन महिला व पुरुष शेतकऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि त्यांना मंचावर स्वतःशेजारी बसविले.