पुणे

हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत चारित्र्यसंपन्न, निष्ठावंतांना देणार संधी : प्रदीप गारटकर, महाविकास आघाडीचे होणार पॅनल अजित दादा पवार करणार नेतृत्व

हडपसर येथे शनिवार ( ता.१८) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इच्छुक उमेदवारांची बैठक हॉटेल कोकिता या ठिकाणी आमदार व प्रमुख पदाधिकारी यांच्यात संपन्न झाली.

या बैठकी दरम्यान हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष एकत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आमच्याकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने उमेदवार निवडीचे अधिकार विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देण्यात आले असल्याचे गारटकर यांनी सांगितले. या निवडणुकीत तरुण युवकांना संधी देणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केल्याने पक्षाकडे उमेदवारीसाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात मागणी केली आहे.

नवीन कोरा, स्वच्छ, चारित्र्यसंपन्न, निष्ठावंतांना व ज्यांच्यावर कसलेही भ्रष्टाचाराचे आरोप नसलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देणार आहे. पक्षामध्ये दोन गट दिसत असल्याने दुसरा गट या ठिकाणी दिसत नाही यावर गारटकर म्हणाले की ती लोकही आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले. जे पक्षाशी गद्दारी करतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. मित्र पक्षाचे काँग्रेसचे नेते व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व इतर यांच्याशी या निवडणुकी संदर्भात चर्चा करून पॅनल तयार करण्यात येणार आहे. सध्या अधिवेशन चालू आहे ते संपले की लगेच अजित दादा पवार व मित्र पक्ष बैठक घेऊन निर्णय घेतील असे गारटकर म्हणाले.

या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पॅनल होणार असले तरी हवेली तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने उमेदवारीत राष्ट्रवादीला झुकते माप मिळेल. तसेच मित्र पक्षांनाही संधी मिळेल अशी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले. तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर,भरत झांबरे, त्र्यंबक मोकाशी यांनी बैठकीचे आयोजन केले.यावेळी आमदार अशोक पवार,चेतन तुपे, संजय जगताप, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, प्रकाश म्हस्के, माणिक गोते,माधव काळभोर, राजेंद्र खांदवे,सोनबा चौधरी, इ.अनेक पदाधिकारी उपस्थित होते. गुढीपाडव्याच्या दिवशी मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

35 वर्ष भाजी व्यापार करीत असताना हडपसर भाजीमार्केट मधील 929 भाजी विक्रेत्यांना पुणे मनपाचे मंडई विभागाचे कायम स्वरुपी परवाने व्यापक आंदोलन आणि लढा उभारुन आमदार चेतन तुपे पाटील यांच्या सहकार्याने मिळवुन देण्यात यशस्वी झालो. भाजी विक्रेत्यांची एक पतसंस्था सुरू केली. गेली 19 वर्षं आपल्या बाजार समितीला प्रशासकीय कारभाराला सामोरे जावे लागले. त्यामुळे आमच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणताही प्रतिनिधी नसताना सातत्याने बाजार प्रशासनाशी वेळोवेळी चर्चा करुन कायम सक्रिय राहिलो.
कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन काम करण्याची संधी दिली तर संपुर्ण महाराष्ट्रात एक चांगला संदेश जाईल आणि आमचा कष्टकरी सुखावेल.
बाळासाहेब भिसे
अध्यक्ष – पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना