इन्स्टाग्रामच्या जगात आपल्या गावरान ठसक्याने आणि मराठमोळ्या अंदाजाने घराघरात पोहोचलेला *महाराष्ट्राचा लाडका रील स्टार, अरुण तुपे* आज आपल्यात नाहीये, हे ऐकून खरंच काळजात धस्स होतंय. छत्रपती संभाजीनगरच्या या गड्याने *’kon_aruntupe’* या नावाने सोशल मीडियावर असा काही राडा घातला होता की, प्रत्येक रील बघताना चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहायचं नाही. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं.त्या मंगळवारची ती सकाळ मोठी चटका लावून जाणारी ठरली. सकाळी सहा वाजता अरुण नेहमीप्रमाणे उठला, घरच्यांशी गप्पा मारल्या, हसलो-खिळलो… सगळं कसं अगदी आनंदी होतं. सकाळी दहा वाजता त्याला एका नवीन रीलच्या शूटसाठी बाहेर पडायचं होतं. पण कामाचा थोडा थकवा जाणवत होता, म्हणून तो आईला सहज बोलून गेला, *”आई, थोडा वेळ डोळा लागतो, मग आवरून शूटला निघतो.”* कुणाला काय माहीत होतं की, महाराष्ट्राला हसवणाऱ्या या कलाकाराची ही शेवटची झोप ठरेल आणि तो पुन्हा कधीच उठणार नाही. वाजले, घरच्यांनी त्याला उठवायला आवाज दिला, पण अरुणकडून काहीच प्रतिसाद आला नाही. तो बेशुद्ध होता.
काळजाचा ठोका चुकला, घरातील लोकांनी धावतपळत दवाखाना गाठला, पण डॉक्टरांनी तपासून जाहीर केलं की आपला अरुण आता या जगात नाही. ज्या आईसोबत त्याने इतके सुंदर आणि प्रेमळ व्हिडिओ केले, त्या आईच्या डोळ्यातील पाणी आज थांबत नाहीये. तिने लाडक्या लेकाला झोपायला पाठवलं खरं, पण तो असा कायमचा झोपी जाईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं.दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या या उमद्या कलाकाराने इतक्या कमी वयात एक्झिट घेतल्यामुळे अख्खा महाराष्ट्र आज हळहळतोय. सोशल मीडियावर अवघ्या काही तासांपूर्वी ज्याची रील पडली होती, जो जगाला हसवत होता, तो माणूस असा शांत कसा झाला? *अरुण, तू जाताना फक्त स्क्रीन कोरी करून नाही गेलायस, तर लाखो चाहत्यांच्या काळजात एक मोठी पोकळी सोडून गेलायस. तुझं ते “आई, आवरून शूटला निघतो” हे वाक्य आता फक्त आठवणींच्या पडद्यावरच गुंजत राहील. तू म्हटल्याप्रमाणे तू झोपायला तर गेलास, पण पुन्हा कधीच न उठण्यासाठी… रीलच्या दुनियेतला हा हसरा तारा आज कायमचा निखळलाय.*
*भावपूर्ण श्रद्धांजली, अरुण! महाराष्ट्राच्या मातीतला तुझा हा रांगडा आवाज आणि तुझं ते हसू कायम आठवणीत राहील.*
