पुणे

*पुणे पोलीस गुन्हे शाखेची मोठी कारवाई; फसवणूक करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त*

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील फरारी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले असताना, खंडणी विरोधी पथक-२ ने फसवणूक करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला शिताफीने अटक केली आहे. हडपसर पोलीस स्टेशन परिसरातील भाजी मंडई येथे पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखिले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी दिलीप विश्वनाथ स्वामी उर्फ जाधव हा साधना विद्यालयाकडे जाणाऱ्या कॅनल रोडवर चोरी करण्याच्या तयारीत आहे. या माहितीची खात्री पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी केल्यानंतर पोलीस उप-निरीक्षक गौरव देव यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी केली असता त्याने फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका वृद्ध महिलेला “गर्दी आहे, दागिने पिशवीत ठेवा” असे सांगून फसवणूक केल्याची कबुली दिली. त्याच्या झडतीत सोन्यासारखी दिसणारी बनावट बिस्किटे आणि बेनटेक्स चेन जप्त करण्यात आली. याशिवाय आरोपीने कराड येथेही अर्टिगा कारमधून प्रवास करत वृद्ध महिलेला बनावट सोने दाखवून लुटल्याचे समोर आले आहे. दिलीप स्वामी हा खुनासाठी अपहरण, ॲट्रॉसिटी आणि फसवणुकीसारख्या गंभीर गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते. या कारवाईत पोलिसांनी एकूण १२,७५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे

.
ही महत्त्वाची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे आणि सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखीले, चेतन आपटे, विनोद महाजण, गणेश खरात आणि आझाद पाटील यांनी केली आहे.