पुणे

म्हाडा’ची प्रक्रिया पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त; कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

पुणे, दि. 22:

‘म्हाडा’च्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. ‘म्हाडा’ची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून यासाठी कोणत्याही दलालाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले
‘म्हाडा’च्या योजनेत घर मिळवून देणाऱ्या दलालाविरुध्द संबंधित विभागाचे मंत्री, पोलीस विभाग, म्हाडा कार्यालय यांच्याकडे तक्रार करा, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडाचा विभागीय घटक) पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर व सांगली येथील विविध योजनेतील एकूण ५ हजार ६४७ सदनिकांच्या सोडतीचा संगणकीय ऑनलाईन उद्घाटन समारंभ नेहरु मेमोरियल सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार अशोक पवार, उपमहापौर सरस्वती शेंडगे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वत:चे शहरात घर असावे, असे प्रत्येकांचे स्वप्न असते परंतु वाढलेली महागाई, घरांच्या वाढलेल्या किंमती यामुळे घर घेण्याचे नागरिकांचे स्वप्न अपूर्ण राहते. सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरे मिळवून देण्यासाठी ‘म्हाडा’च्या माध्यमातून काम सुरु आहे. ‘म्हाडा’च्या योजनांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना दर्जेदार आणि माफक किंमतीत घरे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नागरिकांनी ‘म्हाडा’च्या योजनांवर दाखविलेला विश्वास कौतुकास्पद आहे, असे उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले.
‘म्हाडा’च्या माध्यमातून घरे बांधतांना घरात हवा खेळती राहील तसेच वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था, क्रीडांगणासाठी आरक्षित जागा ठेवावी, झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश देत ‘झाडे लावूया, वनांचे संरक्षण करुया’ असा संदेशही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी दिले.
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, नागरिकांनी ‘म्हाडा’च्या योजनांवर दाखविलेला विश्वास म्हणजे सरकारवर दाखविलेला विश्वास आहे. शहरातील वाहतूककोंडी सोडवित असतांना शहराच्या आजूबाजूच्या गावाचा विकास करणे गरजेचे आहे. शहराजवळ कामाच्या दृष्टिने घर असल्यास नागरिकांची सोय होते, असे उपसभापती श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत संकेतांक क्रमांक ३६७ मोरवाडी पिंपरी या योजनेचा कळ दाबून संगणकीय सोडतीचा शुभारंभ करण्यात आला. तसेच विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते २० टक्के सर्वसमावेशक योजना अंतर्गत संकेतांक क्रमांक ३९२ रॉयल ग्रँड, वाकड या योजनेचा कळ दाबून संगणकीय सोडतीचा शुभारंभही करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘म्हाडा’च्या पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने यांनी केले. तर आभार मिळकत उपअभियंता संजय नाईक यांनी मानले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x