पुणे

दरोडा टाकण्याच्या तयारीतील शिकलकरी टोळीला मदत मागून केले जेरबंद- दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकाची कारवाई

पुणे ः प्रतिनिधी
मोक्काच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या शिकलकरी टोळीचा म्होरक्या आणि त्याच्या गॅंगला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. याकारवाईत पोलिसांनी या टोळीकडेच मदत मागितली अन् त्यांना पकडले आहे. दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व वाहनचोरी संघटितपणे गुन्हे करणाऱ्या मोक्कातील शिकलकरी टोळीप्रमुखासह चौघांना जेरबंद केले, तर दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. आरोपींची अंगझडती घेतली असता, एक गावठी पिस्टल, दोन राउंड, एक लोखंडी कोयता, एक कटावणी, एक कटर, चाकू, दोन कात्रीची पाते, मिरचीपूड असे साहित्य मिळून आले. आरोपींकडून सात गुन्हे उघडकीस आले असून, पुणे-सोलापूर रस्त्यावरील भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे तपासात उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय 28, रा. रामटेकडी), निशांत ऊर्फ ब्लॅक अनिल ननावरे (वय 23, रा. कृष्णानगर, महंमदवाडी), सुनील प्रकाश गायकवाड (वय 23, रा. रामटेकडी), गणेश राजेंद्रशिवाडकर (वय21, रा. रामटेकडी) अशी अटक केली, तर किशोर प्रकाश गायकवाड (मंगळवार पेठ) आणि आकाश गणपत माने (रा. वाघोली) हे दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन फरार असून, पोलीस त्यांचा तपास करीत आहेत. तिलकसिंग गब्बरसिंग टाक याच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचोरी, वाहनचोरी असे 67 गंभीर स्वरूपाचे गुन्हे, तर निशांत ऊर्फ ब्लॅक अनिल ननावरे याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत. सुनील ऊर्फ बावड्या प्रकाश गायकवाड याच्याविरुद्ध 6 गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी सांगितले की, मोक्कातील पाहिजे असलेले आरोपी तिलकसिंग गब्बरसिंग टाक आणि निशांत ऊर्फ ब्लँक अनिल ननावरे त्यांच्या साथीदारांसह उरुळी कांचन येथील डाळिंब रोडवरील पांढरस्थळ कालव्यावर येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पथकाने या परिसरात सापळा लावला. ते पांढरस्थळ कॅनॉल रोडने कार क्रमांक 7777 ही घेऊन येत असल्याचे समजले होते. यावेळी पथकाने येथे सापळा रचला. रस्त्यावर पोलिसांनी त्यांची कार बंद पडली असल्याचा बहाणा केला. या टोळीची कार येताच पोलिसांनी त्यांनाच मदत मागितली. त्यांनीही मदत म्हणून कार थांबवली. पण त्याचवेळी पथकाने त्यांची धरपकडं सुरू केली. यावेळी पथकाने चौघांना अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल, दोन राऊंड, एक लोखंडी कोयता, एक कटावणी, एक कटर, एक चाकू, दोन कात्रीची पाती, मिरची पूड असे साहित्य जप्त केले. आरोपींकडे अधिक तपास केला असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी आणखी सात गुन्ह्याची कबुली दिली असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींवर कोंढवा, येरवडा, विमानतळ, निगडी पोलीस स्टेशनमध्ये 5 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, त्यामध्ये पाच कार जप्त करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय खालापूर (जि. रायगड) आणि विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमधील गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-2, गुन्हे शाखा करीत आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीसआयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, युनीट-5चे सहायक पोलीस निरीक्षक तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, तानाजी कांबळे, सहायक पोलीस फौजदार बुवा कांबळे, पोलीस हवालदार उदय काळभोर, राजेश लोखंडे, राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, साकीर खान, विनायक रामाणे, मनोज खरपुडे, गणेश लोखंडे, शिवाजी जाधव, अमोल सरतापे, गंगावणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x