पुणे

सोपानबाग येथील नाल्यावर बाग फुलवून पुणेकरांसाठी बनविला ऑक्सिजन पार्क – कालिंदा पुंडे

पुणे ः प्रतिनिधी
भैरोबानाल्यामधून सांडपाणी वाहून जाते. दुर्गंधीयुक्त सांडपाण्यावर सोपानबाग येथे बाग फुलवून ऑक्सिजन पार्क तयार केला, ही पुणेकरांसाठी मोठी भेट मिळाली आहे. कोरोना महामारीमध्ये नागरिकांना ऑक्सिजनचे महत्त्व समजले. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष लागवडीबरोबर त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे मत नगरसेविका कालिंदा पुंडे यांनी यांनी व्यक्त केले.
भैरोबानाल्यावरील सोपानबाग नाला पार्क येथे ग्रीन थम्ब आणि एसईबीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय जैवविविध दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका कालिंदा पुंडे, निवृत्त कर्नल सुरेश पाटील, लक्ष्मण साठे, अजित देशपांडे, अरुण पाटोळे, पोलीस निरीक्षक वजीर शेख, लक्ष्य फाउंडेशनचे अध्यक्ष महेश पुंडे, इराना नडगम, विल्सन पिल्ले, विल्सन डॅनियल, सचिन दळवी, सुहास कदम आदी उपस्थित होते. यावेळी नगरसेविका कालिंदा पुंडे यांच्या हस्ते चिमण्यांसाठी बनविण्यात आलेल्या घरट्यामध्ये चिमणी-पाखरांना बाजरी ठेवण्यात आली.
निवृत्त कर्नल सुरेश पाटील म्हणाले की, नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाण्यावर येथील झाडी फुलविली आहे. या ठिकाणी जमिनीतील पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी सहा तलाव बांधले आहेत. त्याचबरोबर येथील जागेमध्ये देवराई फुलविली आहे. सांडपाण्यामुळे नदीतील पाणी प्रदूषित होत आहे, त्यामुळे विहिरींचे पाणी दूषित बनून तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे सांडपाण्यावर नाल्याच्या बाजूला उद्याने विकसित करणे अपेक्षित आहे. तसेच त्यावर झाडी लावून फलविली, तर आयुष्यभर फुकट ऑक्सिजन मिळेल, भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. त्याचबरोबर नाल्याच्या बाजूच्या जागेवर उद्याने विकसित केली, तर नागरिकांसाठी ऑक्सिजन पार्क तयार होईल, असे त्यांनी सांगितले.
श्रीनाथ कवडे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x