पुणे :
पानशेत धरणफुटीला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त निसर्ग संवर्धनाची हाक देत पुण्यावर किंवा देशात अशा प्रकारचा कुठेही प्रलय यायला नको या भावनेपोटी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वृद्धेश्वर घाट येथे जलपूजन करून प्रार्थना करण्यात आली. पानशेत पूरग्रस्त वसाहतीतील ज्येष्ठ नागरिक मधुकर गालिंदे, पंढरीनाथ खोपकर आणि पांडुरंग भोंडे यांच्या हस्ते आणि पानशेत पूरग्रस्तांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले. या वेळी पानशेत पुराच्या आठवणी कथन करण्यात आल्या.
या वेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, महेश हांडे, सौ. अश्विनी कदम आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
पुणे म्हटले की १२ जुलै १९६१ रोजीचे पानशेत धरणफुटीचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. पूरग्रस्तांच्या दोन-तीन पिढ्या पुण्यात आहेत. या पिढ्यांनी जे दु:ख भोगले आहे, ते कोणाच्याही वाट्याला यायला नको. त्यासाठी आपल्याला निसर्ग संवर्धनाची, पृथ्वीच्या रक्षणाची गरज आहे. त्यामुळेच, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निसर्ग संवर्धनाची हाक देत पाण्याचे पूजन करण्यात आले
१२ जुलै ही तारीख पुणेकर नागरिक कधीच विसरू शकत नाहीत. ६० वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या जलप्रलयाने पुणे शहराचा चेहरामोहराच बदलून टाकला असला, तरी ही रात्र हजारो कुटुंबीयांसाठी काळरात्र ठरली होती. आजही, या घटनेचे अनेक साक्षीदार पुण्यात आहेत. त्यांच्या तोंडून या काळरात्रीबद्दल ऐकल्यास आजही डोळ्यांत पाणी आणि अंगावर काटा येतो. या प्रलयात अनेकांनी आपला थाटलेला संसार डोळ्यांदेखत पाण्यात वाहून जाताना पाहिले. अनेकांना कुटुंबीय गमवावे लागले. या सर्वांचे दु:ख शब्दांत मांडता न येणारे आहे.
आज पुणे झपाट्याने वाढत आहे. पानशेत पुरावेळी शहराची लोकसंख्या एक लाख इतकी होती. आता ती ५० लाखांच्या जवळपास पोचली आहे. पुणे हे महानगर असल्याने पुण्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होणे अपरिहार्य आहे. अनेक वर्षांपासून ही स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे. देशातील अनेक नागरिक पुण्यात रोजगार, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी येऊन आनंदाने स्थिरावताना दिसतात. परंतु, पुण्याची संस्कृती बदलली नाही. पुणेरीपण अद्याप टिकून आहे. त्याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे.