पुणे

इन्स्टाग्रामद्वारे ओळख झालेल्या तरुणास मागीतली ५० लाखाची खंडणी ; १२ जणांवर गुन्हा दाखल, ४ जणांना लोणी काळभोर पोलीसांकडून अटक

लोणी काळभोर ( प्रतिनिधी – स्वप्नील कदम ) – 

                      इन्स्टाग्रामद्वारे ओळख झालेल्या तरुणास ऊरूळी कांचन येथे बोलावून हनी ट्रॅपचा वापर करून त्याच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर तिने साथीदारांच्या मदतीने धमकी देवून, त्याला ब्लॅकमेल करीत त्याच्याकडे ५० लाखाची खंडणी मागीतली. तडजोडीअंती त्याचेकडून २० लाख रुपये घेतले याप्रकरणी तरूणीसह एकून १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ४ जणांना लोणी काळभोर पोलीसांनी अटक केली आहे. या टोळीने पनवेल येथील व्यावसायिकाला अश्याच प्रकारे लुबाडल्याचे सिद्ध झाल्याने कोंढवा पोलिसांनी तरूणी व तिच्या इतर साथीदारांना अटक केली आहे.  

                 नर्सरी व्यावसायिक तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून प्रतिभा भातुलकर ( वय २५, रा. भिगवण, ता. इंदापूर ) हिचेसह तिचा भाऊ असे सांगणारा इसम व त्यांचे सोबत असणारे ३ अनोळखी साथीदार, तौफिक शेख ( वय २८, पुर्ण नाव पत्ता माहित नाही ), मंगेश कानकाटे ( वय २८ ), शुभम कानकाटे ( वय २८), साईराज हिम्मत कानकाटे ( वय १९, तिघेही रा. इनामदारवस्ती, कोरेगांवमुळ, ता. हवेली ), ऋतुराज रामदास कांचन ( वय २० ), बंटी उर्फ सिद्धार्थ प्रकाश आमले ( वय २०, दोघे रा. ऊरूळी कांचन ), प्रतिक अजय लांडगे ( वय २०, रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती )  यांचेविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांतील प्रतिभा ही न्यायालयीन कोठडीत असून साईराज कानकाटे, लांडगे, कांचन व आमले यांना लोणी काळभोर पोलीसांनी गुन्हा दाखल झालेनंतर २४ तासांच्या आत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार या हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आलेला २० वर्षीय तरूण नर्सरीचा व्यवसाय करतो. त्याचे मामा ऊरुळी कांचन येथे राहणेस असल्याने त्याची साईराज, ऋतुराज, शुभम, मंगेश यांचेबरोबर ओळख होती. 

                  सदर प्रकार १५ ते २० ऑक्टोंबर २०२० दरम्यान घडला आहे. १५ ऑक्टोबर रोजी त्यांचे इंन्स्टाग्रामवर रोहिणी भातुलकर या नावाने हाय असा मेसेज आला. खात्यावरील डीपीवर एका मुलीचा फोटो होता. त्याने तिचेबरोबर चॅटींग केली असता तिने मी तुला ओळखते. मला कधी भेटतो असे विचारले.

त्यानंतर दोघामध्ये बोलणे सुरु झाले. मी बारामती येथे राहणेस असून दोन दिवसानंतर ऊरुळी कांचन येथे येणार आहे. आपण तेथे भेटु व मज्जा करु असे म्हणाली. सदर बाब त्याने मित्रांना सांगितली. त्यावेळी त्यांनी याबाबत तुला काही मदत आवश्यक असल्यास आम्हाला सांग असे सांगितले होते.

                      त्यानंतर ते रात्री १० वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील शिंदवणे रस्त्यावर  भेटले. लॉजमध्ये घेतले नाही म्हणून त्यांच्या राहण्याची व्यवस्था ऋतुराज याने एका मोबाईल कंपनीच्या ऑफिसमधे केली. तरूणीने त्याला जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. त्यानंतर शेख व इतरांना तिने बोलावून घेतले. सर्वांनी मारहाण करुन त्याच्या पाकीटातील 3 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवून त्याला जबरदस्तीने गाडीत घालून यवत पोलीस ठाण्यासमोर नेले. त्यानंतर इतरांशी संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर ऊरूळी कांचन येथे परत आणून त्याचे मामा व काकास बोलावून प्रकरण मिटवायचे असेल तर त्यांना ५० लाख रुपये दयावे लागतील. नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन जेलमध्ये पाठवतो अशी धमकी दिली. त्यानंतर  चर्चा करुन मध्यस्थी करुन ५० लाख रुपये ऐवजी २० लाख रुपये घेवुन तडजोड करण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सर्वासमोर मंगेश कानकाटे यांचे ऑफिसमध्ये २० लाख रुपये दिले. त्यानंतर सदर तरुणास सोडले व त्यावेळी सर्वजण घाबरलेले असल्याने व तक्रार दिली तर समाजामध्ये नाचक्की होईल या भितीने झाले प्रकाराबाबत कोठेही तक्रार केली नव्हती. परंतू कोंढवा पोलीसांनी या टोळीला अटक केल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.