मुंबई

#Breaking News राज्यातील आगामी महापालिका निवडणुका एक सदस्यीय पद्धतीने प्रभाग” महापालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा करण्याचे आदेश”

मुंबई : (Rokhthok Maharashtra Online ) – |फेब्रुवारी 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या महापालिकांच्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने आदेश जारी केले आहेत.प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यातील बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243 के व 243 झेड ए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणे
व निवडणूकांचे अधिक्षण, संचालन व नियंत्रण करणे याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली आहे.
तसेच, संविधानाच्या अनुच्छेद 243 आणि महाराष्ट्र महानगरनगरपालिका अधिनियम 1959 मधील तरतुदीनुसार महानगरापलिकेची मुदत संपण्यापूर्वी तिची सार्वत्रिक निवडणूक घेणे बंधनकारक आहे.

सन 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या महानगरपालिकांची व्यापकता विचारात घेता प्रभाग रचना
वेळेवर अंतिम करणे सुकर व्हावे म्हणून प्रारूप प्रभाग रचनेची कार्यवाही सुरु करणे आवश्यक आहे.

शासनाने या संदर्भात 31 डिसेंबर 2019 रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम
2019 अन्वये सर्व महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग
पध्दती लागू केली आहे.
त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असेल. तसेच प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने
प्रसिध्द केलेली लोकसंख्येची अलिकडची आकडेवारी म्हणजेच सन 2011 ची लोकसंख्या विचारात घ्यावयाची आहे. त्यानुसार प्रभागांच्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्यात यावा.
कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही 27 ऑगस्ट2021 पासून सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
तसेच कच्चा आराखडा तयार होताच तात्काळ ई-मेलद्वारे पाठवण्यास सांगण्यात आले आहे.