पुणे

हडपसर पोलीस स्टेशन आणि शहीद भगतसिंग प्रतिष्ठानच्या सेवेचा हजारो वारकऱ्यांनी घेतला लाभ रुग्णवाहिकेच्या सेवेमुळे वाचले किमान पाच वारकऱ्यांचे प्राण

पुणे: प्रतिनिधी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात देहभान विसरून भक्ती भावानी पंढरीच्या विठोबारायाच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या वारकऱ्यांना विविध सेवा देण्यासाठी हडपसर पोलीस स्टेशन, शहीद भगतसिंग प्रतिष्ठान आणि प्रणव नलिनी विजय मोरे यांच्या माध्यमातून उन्मेश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्याकडून वारकरी आणि भाविकांसाठी देण्यात आलेल्या वैद्यकीय सेवांचा लाभ हजारो जणांनी घेतला.

तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना रुग्णवाहिकेची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली. या सेवेमुळे किमान पाच वारकऱ्यांचे प्राण वाचले.
वारकरी आणि भाविकांच्या सेवेसाठी हॉस्पिटलच्या आवारात सर्दी, खोकला, ताप अशा सर्वसामान्य विकारांवर औषध उपचार, कांस्य थाळी मसाज, चरण सेवा अर्थात पायाचा मसाज, व्हायब्रेटर मशीन द्वारे मसाज यासह तातडीची गरज असलेल्या रुग्णांसाठी रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामध्ये एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असता त्यांच्यासाठी रुग्णवाहिकेचा वेळीच उपयोग झाला. तसेच एक वारकरी महिला वाटेतील दुर्घटनेत रक्तबंबाळ झाली. त्यांच्यासह तातडीचे उपचार आवश्यक असलेल्या तीन वारकऱ्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी सदर सेवेचा उपयोग झाला
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या दोन्ही पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी आणि भाविकांपैकी सुमारे 1000 पेक्षा जास्त जणांनी कांस्य थाळी मसाज, 500 जणांनी चरण सेवा मसाज, 600 जणांनी व्हायब्रेटर मशीनद्वारे मसाज या सेवांचा लाभ घेतला.

तातडीची वैद्यकीय सुविधा आवश्यक असलेल्या गाडीतळ ते लोणी काळभोर आणि गाडीतळ ते दिवे घाट दरम्यानच्या अनेको रुग्णांना रुग्णवाहिकेची अद्ययावत सेवा उपलब्ध करून देण्यात आली. वारकरी व भाविक बांधवांबरोबरच पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांनी देखील या सेवेचा लाभ घेतला.
वैद्यकीय सेवांबरोबरच वारीत सहभागी झालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी अल्पोपहार आणि पाण्याची व्यवस्था संयोजकांकडून करण्यात आली होती. या सेवेचा लाभ तब्बल दहा हजार पेक्षा अधिक जणांनी घेतला.

या उपक्रमासाठी मोरे परिवारासह हडपसर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी, शहीद भगतसिंग प्रतिष्ठानचे कार्यकर्ते संदीप मोरे, डॉ. संदीप हंबीर, डॉ. संतोष पंडित व डॉ. शिर्के फिजिओथेरपिस्ट डॉ. पूजा पुंडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आणि स्थानिक युवकांनी पुढाकार घेतला. या उत्तम उपक्रमाला राजकीय, सामाजिक आणि अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन त्याचे कौतुक केले. त्याचप्रमाणे या उपयुक्त उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल वारकरी आणि भाविकांनी संयोजकांना आशीर्वाद दिले.
वारकरी आणि भाविकांची सेवा करण्याची संधी लाभल्याबद्दल प्रणव/ नलिनी / विजय मोरे यांनी समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे यापुढील काळात या सेवांची व्याप्ती वाढविणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.