पुणे

राष्ट्रवादीचेच उपाध्यक्ष सलीम सारंग यांचा आमदार संग्राम जगताप यांच्यावर निशाणा; मुस्लिम विरोधी वक्तव्यांवरून संताप

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी आपल्या पक्षातीलच आमदार संग्राम जगताप यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांच्या मुस्लिम विरोधी वक्तव्यांचा तीव्र निषेध केला आहे. जगताप यांनी भाषणात “जहाँ आयेगा लांडा, वहाँ आयेगा डांडा” आणि “जहाँ आयेगा अली, वहाँ आयेगा बजरंगबली” अशी वादग्रस्त आणि समाजात तेढ निर्माण करणारी विधाने केल्याचे सलीम सारंग यांनी म्हटले आहे.

सारंग यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चाललेला असून धर्मनिरपेक्षता व सर्वधर्मसमभाव हेच पक्षाचे खरे अधिष्ठान आहेत. त्यामुळे अशा प्रकारची वादग्रस्त, द्वेषमूलक आणि समाजात फूट पाडणारी वक्तव्ये पक्षाच्या धोरणाविरोधात आहेत.”

सलीम सारंग यांनी ही मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्याकडे केली असून, आमदार संग्राम जगताप यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व त्यांना समज द्यावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.

या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले असून, पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व आता या प्रकरणावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.