पुणे

धक्कादायक घटना : वानवडी  परिसरात एका अल्पवयीन मुलीवर  सामुहिक अत्याचार ; पुणे शहरात प्रचंड खळबळ

पुणे : – पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मध्यंतरी दत्तवाडी परिसरात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार   केल्याची घटना घडली असताना पिंपरी चिंचवडमध्ये देखील अशीच घटना घडली होती. आता पुण्यातील वानवडी  परिसरात एका अल्पवयीन मुलीवर  सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आरोपींनी पीडित मुलीचे रिक्षातून अपहरण  केले. पीडित मुलीला वानवडी परिसरात नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी  7 आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. ही घटना रविवारी (दि.5) सायंकाळी वानवडी परिसरात घडली असून ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 14 वर्षाची पीडित अल्पवयीन मुलगी एका ठिकाणी थांबली होती. त्यावेळी आरोपी रिक्षातून आले. त्यांनी मुलीला रिक्षात बसवून एका ठिकाणी घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेतील पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे समजतेय. ही घटना समजताच वानवडी पोलिसांनी 7 नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींसोबत त्यांचे इतर साथिदार देखील असल्याचे समोर आले आहे. आरोपींना न्यायालयात  नेण्यात आले असून पोलीस त्यांच्या इतर साथिदारांचा शोध घेत आहेत. ही घटना अत्यंत संवेदनशील असल्याने याबाबत संपूर्ण कारवाई पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहिती दिली जाणार असल्याचे पोलिसांकडून  सांगण्यात येत आहे.