पुणे

दुधामध्ये भेसळ करणाऱ्या इसमाविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुणे दि.24: अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने दुधामध्ये भेसळ करणाऱ्या इसमाविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने 29 जुलै 2021 रोजी राजाराम मधुकर खाडे याचे राहते घर गट नं. 291 खाडे वस्ती, पो. लाकडी, ता. इंद्रापुर, जि. पुणे येथे दक्षता विभागाच्या गोपनीय माहिती आधारे धाड टाकली असता सदर ठिकाणी गाय दुधामध्ये व्हे पावडर व लिक्विड पॅराफीन हे अपमिश्रके मिसळुन दुधाची भेसळ होत असल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने 2714 रूपये किमतीचे 118 लिटर भेसळयुक्त गाईचे दुध जप्त करून नष्ट करण्यात आले. व्हे पावडर (गोवर्धन) व लिक्वीड पॅराफीन हे अपमिश्रके 276 किलो रूपये 31 हजार 988 किंमतीचा माल जप्त करण्यात आला होता.

गाय दुधाचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये मिनरल ऑईल (नॉन फूड ग्रेड पॅराफीन ) व स्किम्ड मिल्क पावडर इत्यादींची भेसळ आढळून आल्याने सदर प्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी सुलिंद्र क्षीरसागर यानी वालचंदनगर पोलिस स्टेशन येथे 21 सप्टेंबर 2021 रोजी राजाराम मधुकर खाडे व भेसळकारी पदार्थ पुरविणा-या पुरवठादाराविरुध्द अन्नसुरक्षा व मानदे कायदा 2006 चे उल्लंघन केले असल्याने शिक्षापात्र कलम 59 नुसार व भा.द.वी मधील कलम 272, 273, 328 व 34 कलमानुसार अहवाल (एफआयआर) दिला असुन पुढील तपास वालचंदनगर पोलिस स्टेशनचे
पो. उपनिरिक्षक श्री. नितीन लाकडे करीत आहेत.

प्रशासनातर्फे सर्व अन्न व्यवसायिकांना कायद्याचे तंतोतत पालन करुन निर्भेळ दुध विक्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुधात भेसळ करणा-याविरुध्द या पुढेही प्रशासनतर्फे कडक कारवायांचे सत्र असेच सुरु ठेवण्यात येणार आहे. भेसळीबाबत अथवा अन्न पदार्थ /औषधाच्या दर्जाबाबत काही तक्रार असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 किंवा कार्यालयातील दुरध्वनी क्रमांक 02025882882 अथवा कार्यालयीन ई मेल fdapune2019@gmail.com यावर तक्रार नोदविण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी केले आहे.
सदरची कारवाई प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) अर्जुन भुजबळ व सहायक आयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांच्या उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे, अशोक इलागेर (दक्षता), राहुल खंडागळे व श्रीमती क्रांती बारवकर यांच्या पथकाने केली होती.