पुणे

एटीएम मशीन व रोकड लंपास करणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या

 हवेली प्रतिनिधी :- अमन शेख शिरूर मधील मांडवगण फराटा येथे धाडसी दरोडा टाकून एटीएम मशीन सह सुमारे ८ लाख ३८ हजार रुपये रोकड लंपास करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

मल्हारी भीमराव केदार (वय २९, रा. शिरूर कासार, जिल्हा. बीड), बाळासाहेब एकनाथ केदार, संभाजी त्रिंबक मिसाळ (सर्व रा. शिरूर कासार, बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडवगण फराटा येथे सात ऑक्टोबर रोजी तसेच दौंड तालुक्यातील खडकी येथे १० ऑक्टोबर रोजी एटीएम चोरीचे गुन्हे घडले होते. पहाटेच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीत येऊन एटीएम मशीन सह रोकड लांबविण्यात आली होती. याबाबत शिरूर व दौंड पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा समांतर तपास करत होते. तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक माहिती गोळा केली. यावेळी स्कॉर्पिओ गाडी आष्टी बाजूकडे गेल्याचे सीसीटिव्ही मध्ये दिसून आले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला.पोलिसांनी तपास करत असताना गोपनीय माहिती काढली असता वरील आरोपींनी गुन्हा केल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींनी दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली गाडी हडपसर परिसरातून चोरल्याचे पोलिसांना सांगितले. यातील आरोपी मल्हारी केदार, बाळासाहेब केदार यांच्यावर एटीएम चोरीचे गुन्हे दाखल आहे. तसेच विविध पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक, सचिन काळे संदीप येळे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सहायक फौजदार तुषार पंदारे, पोलिस हवालदार, जनार्दन शेळके, राजू मोमीन, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, चंद्रकांत जाधव, सचिन घाडगे, विजय कांचन, अजय घुले, योगेश नागरगोजे, धीरज जाधव, सहायक फौजदार मुकुंद कदम यांनी केला आहे.