पुण्यातील हडपसरमधील गाडीतळ परिसरातून धक्कादायक वास्तव समोर आलंय… थिल्लर तरुणांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झालेत!
भरदिवसा सोसायटीत घुसून दुचाकीतील पेट्रोल चोरी, बंद घरांचे कुलूप तोडून चोरी, रस्त्यावर अडवून मोबाईल आणि पैसे हिसकावणे… अशा गुन्ह्यांचा अक्षरशः सुळसुळाट गाडीतळ परिसरात सुरू आहे.
गेली अनेक वर्षे हा प्रकार सुरू असूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
व्यसनाधीन तरुण आणि किशोरवयीन मुले चाकू, कोयता, तलवारींचा धाक दाखवत नागरिकांना धमकावत आहेत.
महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. विरोध केल्यास जमावाने हल्ला करण्याची धमकी दिली जाते.
या भागातील काही शाळा आणि मोकळी जागा गुन्हेगारांच्या अड्ड्यात बदलल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
ध्वनीवर्धकांचा त्रास, अनधिकृत वहिवाट आणि सततच्या गुन्ह्यांमुळे अनेक कुटुंबांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
रहिवाशांनी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांना निवेदन देत सीसीटीव्ही बसवणे आणि कडक कारवाईची मागणी केली आहे.
पोलीस प्रशासनाकडून पेट्रोलिंग वाढवण्यात आल्याचे आणि संशयितांना ताकीद दिल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र, या दहशतीवर कधी पूर्णविराम लागणार? नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अजूनही कायम…
