पुणे

बनावट पोलिसाने ज्येष्ठ शेतकऱ्याला १० लाखांचा गंडा!

पुण्यातील शेवाळवाडी, मांजरी बुद्रुक परिसरात बनावट पोलिसाचा सोंग घेऊन एका ज्येष्ठ शेतकऱ्याची तब्बल १० लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ गोविंदराव शेवाळे हे त्यांच्या शेत आणि नर्सरीची पाहणी करण्यासाठी गेले असताना एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवर आला. त्याने स्वतःला पोलीस असल्याचे सांगत चोरीच्या तपासासाठी आल्याचा बनाव केला.
यानंतर त्याने परिसरात चोरीच्या घटना वाढल्याचे सांगून गळ्यातील दागिने सुरक्षित ठेवण्याच्या नावाखाली काढून देण्यास सांगितले.
विश्वनाथ शेवाळे यांनी विश्वास ठेवून पाच तोळ्यांची सोन्याची चैन आणि दोन सोन्याच्या अंगठ्या त्या व्यक्तीकडे दिल्या. मात्र आरोपीने दागिने परत न देता साथीदारासह दुचाकीवरून पलायन केले.
या प्रकारात सुमारे १० लाख रुपयांचे दागिने लंपास झाले आहेत. सध्या मांजरी पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.