पुणे

फक्त जाब विचारला… आणि तरुणावर जीवघेणा हल्ला!

पुण्यातील येरवडा परिसरात मध्यरात्री आरडाओरड करणाऱ्या टोळक्याला जाब विचारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. पंचशीलनगर भागात ३२ वर्षीय तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात उमेश मंगलदास गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, १४ जून रोजी रात्री अडीचच्या सुमारास उमेश गायकवाड हे मित्रांसह पंचशीलनगर भागात उभे होते. त्यावेळी शोएब रशीद कुरेशी आणि त्याचे साथीदार मोठ्याने आरडाओरडा करत तेथे आले.
उमेश यांनी “एवढ्या मोठ्याने आरडाओरडा का करत आहात?” असा जाब विचारताच आरोपी संतापले. सुरुवातीला शिवीगाळ आणि मारहाण झाली, त्यानंतर मुख्य आरोपी शोएब कुरेशीने तीक्ष्ण शस्त्राने उमेश यांच्यावर सपासप वार करत जीवघेणा हल्ला केला.
घटनेनंतर आरोपी फरार झाले. मात्र विश्रांतवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी शोएब कुरेशीला अटक केली आहे.
या प्रकरणातील इतर तीन आरोपींचा शोध सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.