पुणे

पुण्यात धावत्या रिक्षात १४ वर्षीय मुलीचा विनयभंग!

पुण्यातील मुंढवा-केशवनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
१४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा धावत्या शेअर ऑटोरिक्षामध्ये विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही विद्यार्थिनी शिकवणी संपवून लोणकर वस्तीहून घरी परतत होती. त्यावेळी ती शेअर रिक्षामध्ये बसली होती. अवघ्या २०० मीटरवर दोन अज्ञात व्यक्ती रिक्षात चढले आणि गर्दीचा फायदा घेत त्यांनी मुलीचा विनयभंग केला.
मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी तिला गंभीर परिणामांची धमकी दिली. घरी पोहोचल्यानंतर पीडित विद्यार्थिनीने संपूर्ण प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी तातडीने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पीडितेच्या वर्णनावरून एका मुख्य संशयिताचे स्केच तयार करून जारी करण्यात आले आहे.
सध्या मुंढवा पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपींचा शोध सुरू आहे. नागरिकांना या संशयिताबाबत माहिती असल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.