पुणे

पुण्यातील विवाहित महिलेस बीड मध्ये नेऊन अत्याचार – आरोपीवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी: स्वप्नील कदम

पुण्यातील एका विवाहित महिलेला बीडमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचाराचा कळस गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणानं परळीत नोकरी देण्याच्या आणि राहण्यासाठी घर देण्याच्या बहाण्यानं पीडित महिलेला बीड जिल्ह्यातील परळी याठिकाणी घेऊन गेला होता. यानंतर आरोपीनं विविध प्रकारची आमिषं दाखवून पीडित महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.
गणेश कोडी असं अटक करण्यात आलेल्या 24 वर्षीय तरुणाचं नाव असून तो परळी शहरातील गणेशपार परिसरातील रहिवासी आहे. संशयित आरोपी गणेश यानं 36 वर्षीय विवाहितेला नोकरी देण्याच्या आणि राहण्यासाठी घर देण्याच्या बहाण्यानं फूस लावून परळीत नेलं होतं. याठिकाणी गेल्यानंतर आरोपीनं 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी विवाहितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेनं परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
रविवारी पहाटे बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत संशयित आरोपी गणेश कोडी याला अटक केली आहे. 36 वर्षीय पीडित महिला विवाहित असून ती पुण्यातील रहिवासी आहे. तिचं मूळ गाव सोलापूर आहे. गेल्या काही दिवसांपासून पीडित महिला आर्थिक अडचणीचा सामना करत होती. तिला नोकरीची आवश्यकता होती. पीडितेची गरज लक्षात घेत, आरोपीनं ‘तुला नोकरी लावतो, तुला राहण्यासाठी घर देतो’ असं सांगून पुण्याहून बीड जिल्ह्यातील परळी याठिकाणी आणलं होतं.याठिकाणी आरोपीनं पीडितेवर सलग दोन दिवस अत्याचार केला आहे. यापूर्वीही आरोपीनं वेळोवेळी अत्याचार केल्याचं पीडितेनं आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे. आरोपी गणेश कोडी याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास परळी शहर पोलीस करत आहेत.