प्रतिनीधी: स्वप्नील कदम
लोणी काळभोर : हवेली, दौंड व खेड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उध्दारास कामधेनू ठरलेल्या थेऊर ( ता.हवेली ) येथील यशवंत कारखान्याच्या मालमत्तेचे अखेरचे लचके तोडायला सुरूवात झाली आहे. केवळ राजकिय मंडळींची अनास्थेपायी गेली ११ वर्षे बंद अवस्थेत असलेल्या कारखान्याच्या यांत्रिक मशिनरीत चोरी होण्याचा प्रकारानंतर कारखान्याच्या स्थावर मालमत्तेचे आगीने नुकसान होऊन कोट्यवधीं किंमतीच्या मशनरींची राखरांगोळी होण्यास सुरुवात झाल्याने हवेलीचे हे गत वैभव किती असुरक्षित असल्याचा प्रत्यय आला आहे.
थेऊर (ता. हवेली ) येथील यशवंत कारखान्याच्या डिस्टरीलरी प्रकल्पास सोमवारी (दि. २४) रोजी सायंकाळी आग लागल्याने या आगीत मोठे नुकसान झाले आहे. आगीने किती नुकसान झाले याबाबत शेतकऱ्यांना काही माहिती मिळत नसली तरी या ठिकाणी ज्या वित्तीय संस्थेचा ताबा आहे . ती संस्था कारखान्याच्या मालमत्तेला संरक्षण देत नसल्याची स्थिती आहे. काल आगीत नुकसान झाले पण या ठिकाणी कोट्यवधींची मशनरींचे पार्ट गायब होऊनही या मालमत्तेला संरक्षण मिळत नसल्याची आवस्था आहे. सोमवारी लागलेल्या आगीत नुकसान किती झाले हे माहिती नसले तरी कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. दरम्यान या मालमत्तेचे होत असलेल्या नुकसानीबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पवारांची ‘पॉवर ‘ काही दिसेना !
थेऊर कारखाना प्रश्नी ११ वर्षानंतर खुद्द शरद पवार यांनी कारखाना प्रश्नी लक्ष्य घालत १ ऑक्टोबर २०२१ रोजी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या कारखान्याची जमिन विक्री करुन संपूर्ण देणे फेडून कारखाना सुरू करण्याची चर्चा झाली होती. राज्य सहकारी बँक पवार यांनी आदेश दिल्याने कामकाज करील , अशी अपेक्षा होती. मात्र पवार यांच्या सूचनेने एक पान हलले नाही अशी आवस्था आहे. सत्ताधारी मंडळींच्या आशेवर थकबाकीदार डोळे लावून बसले आहेत.