हवेली

महाराष्ट्रातल्या अतिकठीन अशा ७१० फुटी बाण सुळक्यावरून शिवरायांना राज्याभिषेक दिनी मानवंदना

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

फोर्ट ऍडव्हेंचर पुणे आणि मावळे माउंटन रेंजर्स नाशिक ग्रुप च्या गिर्यारोहकांनी शिव राज्याभिषेक दिनी बाण सुळका सर करून महाराजांना मानवंदना दिली. ” शिव राज्याभिषेक दिनी बाण सुळका आरोहण करणारे ते पहिले गिर्यारोहक ठरले.”
आतापर्यंत झालेल्या सगळ्या आरोहण मोहिमा या हिवाळ्यातील असताना, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हा सुळका सुरक्षित रित्या सर करून नवीन विक्रम प्रस्थापित केला. आरोहणासाठी अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील बेलाग रांगेतील अति कठीण श्रेणीतील, अहमदनगरमधील तब्बल ७१० फुट उंचीच्या बाण सुळक्यावर तिरंगा फडकवत २ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही मोहिम फत्ते केली.
या मोहिमेचे यशस्वी नेतृत्व अक्षय भोगाडे (राजगुरुनगर), सचिन पुरी (लोणी काळभोर) आणि चेतन बेंडकुळे ( नाशिक) यांनी केले. अक्षय आणि चेतन यांनी लिड क्लाइंबिंग करून ही मोहीम यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली. बाण सुळका सर करताना आपणास बुक शेप क्लाइंब, क्रॅक क्लाइंब, क्रॉस ओव्हर पॅच, ट्रॅड क्लाइंब आणि मल्टी स्टेज क्लाइंब करावे लागते. हाताची आणि पायाची मजबुत आणि घट्ट पकड करून पुढे जावे लागते. सेफ क्लायम्बिंग इनिशिएटिव्हने केलेल्या नवीन महात्मा गांधी बोल्टींग मुळे हे आरोहण शक्य झाले असे त्यांनी सांगितले. गिरिप्रेमी तर्फे घेतल्या जाणाऱ्या रॉक क्लाइंबिंग कोर्स मुळे हे यश मिळाल्याचे ही अक्षय ने आवर्जून सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील सांधण दरी जवळच्या साम्रद गावाजवळ बाण सुळका आहे. सह्याद्री पर्वत रांगांमघील हा सुळका अत्यंत अवघड मानला जातो. नावाप्रमाणेच सह्याद्रीत बाणासारखा दिसणारा, शेकडो वर्षे ऊन वारा पाऊस झेलनारा, निसरते आणि ठिसूळ कातळ यामुळे गिर्यारोहकांची कसोटी घेणारा हा सुळका.
४ जून रोजी भल्या पहाटे ६ वाजता साम्रद गावातून मावळे निघाले. जवळपास सकाळी ९ वाजता बाण च्या पायथ्याला पोहोचून शिवरायांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करून शिव राज्याभिषेक विशेष या मोहिमेची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव या जयघोषाने आरोहणास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ३००- ३५० फुटचा क्लाइंब करत असताना खडा चढाई मार्ग, ठिसूळ कातळ आणि मध माश्यांची पोळी ही प्रमुख आव्हाने होती. दुसऱ्या दिवशी (५ जून) सकाळी ८ वाजता पुन्हा राहिलेलं आरोहण करण्यासाठी अक्षय आणि चेतन यांची जोडगोळी पुढे सरसावली. त्यांना सचिन, राहुल, दर्शन, अभिजित हे मोलाचे सहकार्य देत होते आणि संध्याकाळी ६.३० च्या सुमारास बाण वर तिरंगा डौलाने फडकला आणि भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणाने परिसर दणाणून गेला. दोन दिवसांच्या मोहिमेत सुळक्याची आरोहण साठी काठिण्य पातळी, मार्गातील अडथळे, ऊन वारा पाऊस, पाण्याची कमतरता अशा अनेक गोष्टींचा सामना करत रात्री ९ वाजता सर्व गिर्यारोहक सुरक्षित रित्या खाली आल्यानंतर ही मोहीम फत्ते झाली.
      पहिल्यांदा १९८४ साली सुळका सर झाला सरबाण सुळका दिवंगत गिर्यारोहक मिलिंद पाठक आणि त्यांच्या संघाने १९८६ साली सर केला. त्यानंतर विवेक मराठे आणि त्यांच्या पथकाने १९९१ साली या सुळक्यावर यशस्वी चढाई केली. पाण्याचे दुर्भिक्ष्य, अतिशय दुर्गम प्रदेश आणि अत्यंत खडतर चढाई या मुळे गिर्यारोहकांना हा सुळका आव्हान देत असतो.
या मोहिमेत सचिन पुरी, अक्षय भोगाडे, रवी कुंभार, चेतन बेंडकुळी, अभिजित पंडित, गौरी राऊत, राहुल काळे, अश्विनी सोनिपित्रे, अजय बोंबले, दर्शन वडजे, गणेश राऊत, अजय लोखंडे,मयूर गांगुर्डे, साहिल चव्हाण आदी युवा गिर्यारोहक सहभागी झाले होते. याआधी सुद्धा वजीर, वानरलिंगी, शेंडी सुळका, हरिहर गडाचा स्कॉटिश कडा, कळकराय सुळका सर केला आहे व आता हा अतिकठीण श्रेणीतला बाण सुळका सर करून आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे, भविष्यात देखील अशाच साहसी मोहीमा यशस्वी करण्याचा त्यांचा मानस आहे.