पुणे

जन्मदात्या आईच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या नराधमास लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

हवेली तालुक्यातील कदम- वाकवस्ती येथे जन्मदात्या आईवरच चाकूने वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरात काल बुधवारी (ता. २८) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

अभिजित गोपीचंद दरेकर (वय ३२, रा. बालाजी हाईटस, संभाजीनगर, कदमवाकवस्ती) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई सिंधु गोपीचंद दरेकर (वय ५०, रा. कदमवाक वस्ती) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिंधु दरेकर यांचा आरोपी अभिजित दरेकर हा मुलगा आहे. आरोपी अभिजित दरेकर याला दारूचे व्यसन असून तो काही काम धंदा करीत नाही. आरोपी अभिजित दरेकर हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन बुधवारी (ता. २८) सायंकाळी सव्वा सात
वाजण्याच्या सुमारास घरी आला.

त्यानंतर आरोपी अभिजितने आई सिंधु व त्यांची सून मनिषा यांना शिवीगाळ केली. तुम्हाला लय मस्ती आली काय, मी आज तुम्हाला जिवंत सोडत नाही, असे म्हणून देवघरातील चाकू घेतला. आणि आरोपीने आई सिंघू यांच्या डोक्यात वार केला. तसेच देवघरातील पाणी प्यायचा तांब्या घेऊन मारहाण केली. याप्रकरणी सिंधु दरेकर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

दरम्यान, आरोपी अभिजित दरेकर याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी अभिजित दरेकर याला अटक केली आहे. तरी, पुढील पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करीत आहेत.