विद्यार्थ्यांनी साकारले संत ज्ञानेश्वर, तुकाराम आणि विठ्ठल | ZP शाळेचा अनोखा सोहळा

Rokhthok Maharashtra 4 0

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंब्रज गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. एका बाजूला जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या चर्चा सुरू असताना, दुसऱ्या बाजूला अशा शाळांमधून संस्कार, संस्कृती आणि परंपरा जपणारे उपक्रम राबवले जात असल्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले.
या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह वारकरी संप्रदायातील विविध संतांची वेशभूषा परिधान करून टाळ-मृदुंगाच्या गजरात गावातून आणि शाळेच्या परिसरातून दिंडी काढली. विद्यार्थ्यांचा उत्साह, पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिमय वातावरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमाचे पालकांनीही मनापासून कौतुक केले.
या कार्यक्रमावेळी मुख्याध्यापिका सौ. सुनिता तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एस. ए. उतेकर, एस. ए. भोसले, एस. एस. मोहिते, के. एम. महाडिक, एस. एस. लोकरे, जे. ए. पाटील, एस. एस. कचरे, एस. ए. जाधव, एन. व्ही. वसावे, एस. बी. शिंदे आणि बी. आर. बन्ने हे सर्व शिक्षक, शिक्षिका, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, भारतीय संस्कृती आणि वारकरी परंपरेची जपणूक होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.