पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार? HCMTR प्रकल्पाला गती; नोव्हेंबरमध्ये पहिल्या निविदा

Rokhthok Maharashtra 9 0

पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग अर्थात HCMTR प्रकल्पाला आता गती मिळण्याची शक्यता आहे.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम चार टप्प्यांत करण्यात येणार असून, पहिल्या दोन टप्प्यांच्या निविदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात काढण्याची महापालिका प्रशासनाची तयारी आहे.यामध्ये सिंहगड रस्ता ते लुल्लानगर आणि विमाननगर ते बॉम्बे सॅपर्स या दोन मार्गांना प्राधान्य देण्यात आले आहे. या भागात तुलनेने कमी भूसंपादन करावे लागणार असल्याने हे टप्पे आधी हाती घेतले जाणार आहेत.महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या दालनात याबाबत बैठक झाली. या बैठकीला महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि सभागृह नेते गणेश बीडकर उपस्थित होते.HCMTR प्रकल्प सुमारे 36 किलोमीटर लांबीचा आणि 24 मीटर रुंदीचा उन्नत मार्ग असणार आहे. या मार्गावर 34 प्रमुख चौक आणि 33 रॅम्प प्रस्तावित आहेत.या प्रकल्पातील मोठा भाग विद्यमान 24 मीटर रुंदीच्या रस्त्यांवरून जाणार आहे. मात्र काही ठिकाणी सरकारी आणि खासगी जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे.हा प्रकल्प तीन वर्षांत मार्गी लावण्याचा प्रयत्न असून, भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून विशेष सहकार्य मिळेल, अशी माहिती गणेश बीडकर यांनी दिली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.