त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ देवस्थान अध्यक्षाविरोधात बलात्काराचा गुन्हा; अध्यक्षपदही गेलं!
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. राहुल साळुंखे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, राहुल साळुंखे यांनी लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र, नंतर लग्नाबाबत विचारणा केली असता त्यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
फसवणूक झाल्याचा आरोप करत पीडित महिलेने नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर राहुल साळुंखे फरार असल्याची माहिती असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत संत निवृत्तीनाथ संस्थानच्या विश्वस्त मंडळाने बैठक घेतली आणि साळुंखे यांना अध्यक्षपदावरून बडतर्फ करण्याचा ठराव एकमताने मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत. मात्र, आरोप सिद्ध होईपर्यंत संबंधित व्यक्तीला दोषी मानता येणार नाही.





