ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण; जीव वाचवण्यासाठी पळताना दुर्दैवी मृत्यू, ७ संशयितांवर गुन्हा

Rokhthok Maharashtra 31 0

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण; पळताना दुर्दैवी मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवरे गावात ग्रामसभेदरम्यान झालेल्या वादाला गंभीर वळण लागलं आणि ग्रामसेवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृत ग्रामसेवकाचं नाव प्रल्हाद पाटील, वय ५२ वर्षे, असं आहे.
१७ ऑगस्ट रोजी शिवरे येथे ग्रामसभा सुरू असताना जुन्या बिलांच्या मुद्द्यावरून ग्रामसेवक पाटील आणि काही ग्रामस्थांमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर पाटील यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
मारहाणीमुळे घाबरलेल्या पाटील यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून धाव घेतली. मात्र, काही अंतरावरच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
पाटील यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? मारहाणीनंतर धावताना त्यांचा मृत्यू कसा झाला? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर बोदर्डे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून, शिवरे आणि बोदर्डे परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.