मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या. 35 हजार प्रेक्षक क्षमतेचे अत्याधुनिक स्टेडियम आणि मल्टी स्पोर्ट्स हब उभारण्याचा मार्ग मोकळा.
कोल्हापूरला आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटची नवी ओळख मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला.
या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे, प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे ३१.९० एकर शासकीय जागेवर बीसीसीआय आणि आयसीसीच्या निकषांनुसार ३५ हजार प्रेक्षक क्षमतेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार आहे. या प्रकल्पात आधुनिक पॅव्हेलियन, सराव मैदाने, इनडोअर प्रशिक्षण केंद्र, स्पोर्ट्स सायन्स सेंटर, क्लब हाऊस, फ्लडलाइट्स, क्रिकेट म्युझियम, वाहनतळ, सौर ऊर्जा प्रकल्प आणि अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था उभारली जाणार आहे.
याशिवाय बॉक्सिंग, कुस्ती, जलतरण, ज्युडो, आर्चरी, टेबल टेनिस आणि फेन्सिंगसारख्या विविध खेळांसाठीही जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून कोल्हापूरला मल्टी स्पोर्ट्स हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक खेळाडूंना आधुनिक सुविधा, रोजगाराच्या नवीन संधी आणि क्रीडा पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.





