भेकराईनगरमध्ये विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला! हडपसर–सासवड महामार्गावर सुरक्षित पादचारी मार्गाचा अभाव; दुभाजकावरून उड्या मारत विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
भेकराईनगर : हडपसर–सासवड राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असतानाच भेकराईनगर परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. महामार्ग ओलांडण्यासाठी सुरक्षित पादचारी मार्गाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना चक्क दुभाजकावरून उड्या मारत भरधाव वाहनांमधून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली असून, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
भेकराईनगर परिसरात प्राथमिक व माध्यमिक शाळांसह विविध क्लासेस आणि शैक्षणिक संस्था आहेत. गंगानगर, रूपीनगर, हरपळे वस्ती, त्रिवेणीनगर, पॉवर हाऊस, गजानननगर तसेच गोडावून परिसरातून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येथे ये-जा करतात. महामार्गावरील वाहनांची मोठी वर्दळ आणि वेग लक्षात घेता विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना मोठा धोका पत्करावा लागत आहे.
‘अपघात झाल्यानंतर जागे होणार का?’ नागरिकांचा सवाल
या गंभीर समस्येकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वाहतूक पोलिसांचे पुरेसे लक्ष नसल्याची तक्रार पालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. ‘एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासन उपाययोजना करणार का? अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची?’ असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
महामार्गाचे रुंदीकरण करताना केवळ वाहनांची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच पादचारी आणि विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही विचार करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विकास महत्त्वाचा असला, तरी तो विद्यार्थ्यांच्या जीवाच्या किमतीवर नको, अशी भूमिका नगरसेवक रमेश निवंगुणे यांनी व्यक्त केली.
तातडीने स्कायवॉक उभारण्याची मागणी
शाळांच्या परिसरात सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आधीच ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने भेकराईनगर येथे तातडीने पादचारी स्कायवॉक उभारावा, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक संतोष भाऊ हरपळे यांनी दिला आहे.
— संतोष भाऊ हरपळे
नगरसेवक, फुरसुंगी नगरपरिषद
रोखठोक न्युज (गणेश भागीवंत) :–





