राज्यस्तरीय भित्तिपत्रक स्पर्धा उत्साहात संपन्न एंजल कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राज्यभरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; सर्जनशीलतेला मिळाले व्यासपीठ
फुरसुंगी : ओम शिक्षण संस्था संचलित एंजल कॉलेज ऑफ फार्मसी येथे वर्ल्ड फार्मासिस्ट डेच्या निमित्ताने राज्यस्तरीय भित्तिपत्रक स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. एंजल कॉलेज ऑफ फार्मसी आणि नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील विविध फार्मसी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
फार्मसी क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक, सर्जनशील आणि माहितीपूर्ण भित्तिपत्रके सादर केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि विषयातील ज्ञानाला प्रभावी व्यासपीठ मिळाले. तसेच फार्मसी क्षेत्रातील विविध पैलू, औषधशास्त्रातील माहिती आणि जनजागृतीपर संदेश भित्तिपत्रकांच्या माध्यमातून उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आले.
स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. प्रवीण जावळे उपस्थित होते. स्पर्धेत सादर करण्यात आलेल्या भित्तिपत्रकांचे परीक्षण डॉ. नितीन गवई आणि डॉ. तानाजी नांदगुडे यांनी केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, सचिव सचिन अग्निहोत्री, संचालक अविनाश शेलुकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रा. मोनिका पवार, प्रा. मंगल लाटे, प्रा. करिष्मा टीकारीया, प्रा. ऋषिकेश यांदे, प्रा. युवराज नवखंडे तसेच सौ. उर्मिला तुपे यांनी विशेष परिश्रम घेतले. राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरण प्राप्त झाले.
रोखठोक न्युज (गणेश भागीवंत)





