पुण्यात स्क्रॅपच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक!
पुण्यात स्क्रॅप मटेरियलच्या व्यवहारातून तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश जयंतीलाल शहा, वय ६२, यांचा स्क्रॅप मटेरियल खरेदी करून कंपन्यांना पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. त्यांना स्क्रॅप मटेरियलची मागणी आली होती. त्यानंतर त्यांच्या भावाने दिलेल्या क्रमांकावरून त्यांनी आरोपींशी संपर्क साधला.
आरोपी शरद कैलास ढोकले, वय ४१, आणि निलेश दत्तात्रय खुटवड, वय ४२, यांनी लोड केलेल्या ट्रकचे फोटो आणि पावत्या दाखवत शहा यांचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे.
स्क्रॅप खरेदीसाठी आगाऊ पैसे द्यावे लागतील, असे सांगून आरोपींनी ५० लाख रुपयांचा धनादेश घेतला. धनादेश वटूनही स्क्रॅप मटेरियलचा पुरवठा करण्यात आला नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार १९ ते २३ मे २०२६ दरम्यान घडला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिनेश शहा यांनी स्वारगेट पोलिसांत तक्रार दाखल केली.याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप सिसोदे पुढील तपास करत आहेत.





