दिवे घाटातील हल्लेखोर इंदापूरमध्ये जेरबंद!

Rokhthok Maharashtra 6 0

दिवे घाटात मद्यधुंद अवस्थेत मारहाण करून पळालेल्या आरोपीला फुरसुंगी पोलिसांच्या डी.बी. पथकाने इंदापूरमधून जेरबंद केलं आहे.

30 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 ते 12.30 वाजण्याच्या सुमारास प्रवीण राजकुमार शेटे, वय 32 वर्षे, हे आपल्या MH12-YD-9607 क्रमांकाच्या किया सेल्टॉस कारने पुण्याहून जेजुरीच्या दिशेने जात होते. यावेळी दिवे घाटातील घाटाच्या वळणावर अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करून डोक्यात आणि कपाळावर मारहाण केली. गंभीर जखमी करून आरोपी फरार झाला.

या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 389/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी दिवे घाट परिसरातील 65 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला.

आरोपी आदिनाथ दत्तात्रय मोरे, रा. कन्हाडगाव, ता. बारामती, जि. पुणे याला इंदापूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.