रिक्षा मिळेना, नागरिकांचा संताप; 3 तास ताटकळत
डोंबिवलीच्या केळकर रोड परिसरात रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मानपाडा रोड, स्टार कॉलनी आणि सागाव परिसरातील प्रवाशांना रिक्षा मिळवण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रिक्षाचालकांकडून भाडे नाकारणे, रिकाम्या रिक्षा प्रवाशांसमोरून पुढे नेणे, असे प्रकार सर्रास सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बुधवारी रात्री नागरिकांना तब्बल दोन ते तीन तास रिक्षासाठी रांगेत उभे राहावे लागले.
यानंतर नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केले. RTO आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. मात्र, प्रशासनाने नागरिकांची बाजू न घेता रिक्षाचालकांना पाठीशी घातल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
रिक्षा भाडे नाकारणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, केळकर रोडवर कायमस्वरूपी अधिकारी नेमावेत आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या मागण्या मान्य न झाल्यास कल्याणमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.





