नातीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपातील आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Rokhthok Maharashtra 7 0

 

पुणे : पुणे शहरातील मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सहा वर्षांच्या नातीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपासंदर्भातील गुन्ह्यात आरोपी रविंद्र शामराव भिसे (वय ५८, रा. मुंढवा, पुणे) यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. मिलिंद एन जाधव यांनी हा आदेश दिल्याची माहिती आहे.

सदर प्रकरणात आरोपीला २१ जानेवारी २०२६ रोजी मुंढवा पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल झाले आहे. यापूर्वी पुणे जिल्हा न्यायालयाने १ जून २०२६ रोजी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर या निर्णयाविरोधात ॲड. हर्षवर्धन एम. पवार व ॲड. वाजेद खान बिडकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला.

मुंबई उच्च न्यायालयात आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. हर्षवर्धन एम. पवार यांनी फिर्यादीच्या कथनातील व साक्षीदारांच्या जबाबांतील कथित तफावती, वैद्यकीय पुराव्याची स्थिती, फिर्यादी व आरोपी यांच्यातील कौटुंबिक वाद तसेच आरोपीला अटक करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन झाले किंवा नाही, हे मुद्दे न्यायालयासमोर मांडले.

कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर आरोपीला या गुन्ह्यात खोटे गोवण्यात आल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवादही न्यायालयासमोर मांडण्यात आला. तसेच, तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर जामीन मंजूर करण्याची विनंती करण्यात आली.

बचाव पक्षाच्या युक्तिवादाचा विचार करून मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीला ₹२५,००० च्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असून, त्याची कारागृहातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.