मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका! राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई

Rokhthok Maharashtra 8 0

पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल चेस चॅम्पियनशिप २०२६) एआयएस स्कुल, अहमदाबाद येथे शिकणाऱ्या भारताच्या क्रिशव कवित शाह याने चमकदार कामगिरी करत देशाच्या शिरपेचात मानाचा सुवर्ण तुरा रोवला आहे. पंधरा वर्षांखालील गटात अव्वल स्थान पटकावत त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे या स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशी एकूण चार पदके पटकावून क्रिशवने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ क्षेत्रात आपल्या कौशल्याची छाप उमटविली आहे.
क्वालालंपूर येथील सिटिटेल मिड व्हॅली हॉटेलमध्ये ४ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रकुल बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित या स्पर्धेत भारतासह मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, केनिया, बांगलादेश, पाकिस्तान, कॅनडा, नामिबिया, ब्रुनेई आणि स्कॉटलंड अशा १३ देशांतील २९३ युवा बुद्धिबळपटूंनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेत क्रिशवने पंधरा वर्षांखालील गटात आपल्या बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि अचूक निर्णयक्षमतेच्या जोरावर उल्लेखनीय यश मिळविले. विविध देशांतील तगड्या खेळाडूंशी स्पर्धा करताना त्याने दाखविलेला आत्मविश्वास व संयम विशेष लक्षवेधी ठरला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे त्याच्या पुढील क्रीडा कारकिर्दीला नवी दिशा मिळणार आहे.

क्रिशव हा मूळचा उद्योगपती कुटुंबातील आहे. त्याचे वडील कवित शहा आणि आई केयुल शहा असून आजोबा ज्येष्ठ उद्योगपती व जयराज ग्रुपचे संस्थापक डॉ. राजेश शहा आणि आजी हंसा शहा आहेत. कुटुंबाचा शैक्षणिक आणि व्यावसायिक वारसा सांभाळतच क्रिशवने क्रीडा क्षेत्रातही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
या यशामुळे शहा कुटुंबीयांसह एआयएस स्कुल, अहमदाबाद परिवारासह जगभरातील जैन समुदायकडून त्याचे अभिनंदन केले जात आहे. दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई करून त्याने कुटुंबीयांसह भारताची मान उंचावली आहे. भविष्यातही त्याने अशाच प्रकारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादन करून भारताचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा ज्येष्ठ उद्योगपती व जयराज ग्रुपचे संस्थापक डॉ. राजेश शहा व्यक्त केल्या आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.