इस्लामपुरात २० वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप; एक आरोपी अटकेत, दुसरा फरार
इस्लामपुरात २० वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप; एक आरोपी अटकेत, दुसरा फरार
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरातून २० वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपींशी ओळख होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत तिला इस्लामपूर येथील कामेरी रस्त्यावरील एका लॉजवर नेण्यात आल्याचा आरोप आहे.
तिथे शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन, तरुणीची शुद्ध हरपल्यानंतर दोघांनी तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शार्दुल विद्यापती पाटील याला पोलिसांनी अटक केली असून, प्रथम सचिन पाटील हा फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.
पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.





