पिंपळवंडी हादरले! १० वर्षीय मुलीवर अत्याचारानंतर हत्या; पोलिसांना मदत करणारा तरुणच संशयित

Rokhthok Maharashtra 9 0

पिंपळवंडीत १० वर्षीय मुलीची हत्या; परिसरात संताप
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपळवंडी येथे १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा प्राथमिक तपास पोलिसांनी केला आहे.
मंगळवारी दुपारपासून ही मुलगी बेपत्ता होती. कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून शोध सुरू असताना रात्री साडेनऊच्या सुमारास लेंडेस्थळ परिसरातील ओढ्याजवळ झाडाशेजारी तिचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी तपास सुरू केला. गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना एका २५ वर्षीय तरुणावर पोलिसांचा संशय गेला.
धक्कादायक बाब म्हणजे मुलीचा शोध सुरू असताना हा संशयित ग्रामस्थांमध्ये मिसळून पोलिसांना मदत करत होता आणि सीसीटीव्ही फुटेज पाहण्यातही सहभागी झाला होता. मात्र तपास पुढे गेल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित मुलीच्या घराशेजारी राहत होता आणि ओळखीचा फायदा घेत त्याने तिला घराबाहेर नेल्याचा संशय आहे. त्यानंतर अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला आहे.
या घटनेने पिंपळवंडी परिसर हादरला असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.