नवनाथ वाघमारेंच्या वक्तव्यावरून संताप; कायदेशीर कारवाईची मागणी!

Rokhthok Maharashtra 31 0

पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मराठा समाजातील महिला आणि मुलींबाबत प्रसारमाध्यमांसमोर कथित आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांच्यावर करण्यात आला आहे.
या प्रकरणी नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी अखंड मराठा समाज, महाराष्ट्र राज्य – पुणे जिल्ह्याच्या वतीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात निवेदन साद करण्यात आले.
या कथित वक्तव्यामुळे समाजातील महिला आणि मुलींच्या सन्मानाला धक्का पोहोचल्याची भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. तसेच अशा वक्तव्यांमुळे समाजात तेढ आणि वैमनस्य निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित वक्तव्याची सत्यता आणि संपूर्ण संदर्भ तपासावा, उपलब्ध व्हिडिओ व इतर पुरावे तपासावेत आणि लागू कायदेशीर तरतुदीनुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गायकवाड यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले. प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा अखंड मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, कोणत्याही समाजाविरोधात द्वेष किंवा वैमनस्य निर्माण करणे हा उद्देश नसून महिला-मुलींचा सन्मान, सामाजिक सलोखा आणि कायद्याचे राज्य अबाधित राहावे, यासाठी कायदेशीर मार्गाने ही मागणी करण्यात आल्याचे अखंड मराठा समाजाने स्पष्ट केले आहे.
निवेदनावेळी अॅड. शुभम फडतरे, सुधीर मते, सचिन गवंड, आकाश देशमुख, संतोष भोगाडे आणि समीर पायगुडे यांच्यासह अखंड मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.