लोणी काळभोरमध्ये अनधिकृत इमारतींवर PMRDAचा हातोडा; स्वस्त फ्लॅट घेणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले

Rokhthok Maharashtra 5 0

 लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती परिसरातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. पीएमआरडीए म्हणजेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या भागातील अनधिकृत बांधकामांवर आणि इमारतींवर हातोडा चालवण्यास सुरुवात केली आहे. या धडक कारवाईमुळे स्वस्तात फ्लॅट घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे धाबे दणाणले असून, संपूर्ण परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.”

कमी किमतीत हक्काचे घर मिळते, या आमिषाला बळी पडून अनेक नागरिक आपल्या आयुष्याची जमापुंजी अनधिकृत फ्लॅट खरेदी करण्यासाठी पणाला लावतात. मात्र, लोणी काळभोरमधील या कारवाईने नागरिकांचे डोळे उघडले आहेत. अनेकदा फ्लॅट घेताना ती जमीन ‘एनए’ (बिगरशेती) आहे का? त्याचा लेआउट मंजूर आहे का? इमारत शासन नियमाप्रमाणे कर भरून नियमित केली आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे नागरिक दुर्लक्ष करतात. बिल्डरांच्या भूलथापांना बळी पडल्यामुळे आज सर्वसामान्य नागरिकांचे संसार उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.”

“लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती परिसरातील अनधिकृत बिल्डिंग धारकांवर झालेल्या या कारवाईनंतर आता पीएमआरडीएच्या रडारवर अजून किती बिल्डिंग्स आहेत, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पीएमआरडीएने अशा अनेक अनधिकृत बांधकामांची यादी तयार केली असून, येणाऱ्या काळात कारवाईचा हा बडगा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनधिकृत फ्लॅट विकणारे बिल्डर आता प्रशासनाच्या निशाण्यावर आले आहेत.”

या संपूर्ण कारवाईवरून एकच गोष्ट स्पष्ट होते की, फ्लॅट घेताना नागरिकांनी आता कमालीचे सावध होणे गरजेचे आहे. नाहीतर बिल्डरांचे खिसे भरतील, पण कारवाईच्या कचाट्यात पडून तुमची कष्टाची कमाई आणि तुमचे कुटुंब धोक्यात येईल. पीएमआरडीएच्या यापुढील कारवाईत कोणकोणत्या इमारतींवर हातोडा पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.