घोरपडीत विसर्जन मिरवणुकीत भीषण अपघात; १८ वर्षीय हलगी वादकाचा मृत्यू
पुण्यातील घोरपडी परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान ट्रॉलीखाली आल्याने १८ वर्षीय हलगी वादकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.मृत युवकाचे नाव विघ्नेश पवार, वय १८, रा. आदिनाथ सोसायटी, रामटेकडी, हडपसर असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास बी. टी. कवडे मार्गावर गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. यावेळी विघ्नेश पवार हा एका गणेश मंडळाच्या ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीच्या मागील बाजूस बसला होता.
मिरवणूक काळूबाई चौक परिसरात आली असताना विघ्नेश अचानक ट्रॉलीच्या चाकाखाली आला. ट्रॉलीचे चाक त्याच्या छातीवरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला.घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे गणेश विसर्जन मिरवणुकीतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी आवश्यक कार्यवाही सुरू केली असून, अपघाताचा पुढील तपास केला जात आहे.





