एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा! १५ वर्षे शोषण केल्याचा आरोप

Rokhthok Maharashtra 5 0

अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब सदाराम खेवरे यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.
लग्नाचे आमिष दाखवून तब्बल १२ ते १५ वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणात राहुरी येथील डॉ. संजयदादा म्हसे आणि डॉ. अनंत शेकुकर या दोन डॉक्टरांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, संबंधित महिला या काळात सात ते आठ वेळा गर्भवती राहिली. त्यानंतर गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्याचा आरोपही तिने केला आहे. यामुळे प्रकृती खालावल्याचा आणि गंभीर आरोग्यविषयक त्रास झाल्याचा दावाही महिलेने केला आहे.
श्रीरामपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई अशा विविध ठिकाणी हे प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल खैरे करत आहेत.
दरम्यान, गेल्या ३० वर्षांपासून अहिल्यानगरच्या राजकारणात सक्रिय असलेल्या रावसाहेब खेवरे यांच्यावरील या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, या आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.