किरकोळ वादातून 21 वर्षीय शुभमची हत्या! 5 वर्षांनंतर 8 जणांना जन्मठेप

Rokhthok Maharashtra 6 0

गाडी चालविण्यावरून झालेला किरकोळ वाद… त्यातून जमलेला जमाव… आणि कोयते, लाकडी दांडके अन् दगडांनी केलेला भीषण हल्ला! अखेर या हत्या प्रकरणात आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मावळ तालुक्यातील जांभूळ येथे १९ जानेवारी २०२१ रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. एक्झर्बिया सोसायटीजवळ कार चालविण्यावरून झालेल्या वादातून २१ वर्षीय शुभम विलास डोंगरे याच्यावर आठ जणांनी मिळून प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात शुभमचा मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ प्रशांत डोंगरे गंभीर जखमी झाला होता.
या प्रकरणाचा निकाल वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला आहे. जखमी साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय पुरावे आणि आरोपींच्या कपड्यांवरील रक्ताचे DNA अहवाल हे पुरावे महत्त्वाचे ठरले.
या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच एका आरोपीला विनयभंगाच्या गुन्ह्यात पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आहे. पाच वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर शुभम डोंगरे हत्या प्रकरणात अखेर आठ आरोपींना जन्मठेप झाली असून, या निकालामुळे मावळमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.