शिवाजीनगर कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार! आधी बंदूक, नंतर कोयत्याने वार; तरुणाचा हात छाटला!
पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरात बुधवारी भरदिवसा रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. खुनाच्या गुन्ह्यात अवघ्या चार दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आलेल्या मंदार मारुती किवळे याच्यावर चार जणांनी जीवघेणा हल्ला केला.
दुपारी सव्वा एकच्या सुमारास न्यायालयातील चेंबर क्रमांक ६३ बाहेर असताना हल्लेखोरांनी दोन पिस्तुलांतून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळ्या न सुटल्याने आरोपींनी कोयते काढून मंदारवर सपासप वार केले. या हल्ल्यात त्याचा एक हात मनगटापासून छाटला गेला असून तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे, २०२५ मध्ये कात्रजमधील संतोषनगर येथे झालेल्या शुभम सुभाष चव्हाण हत्या प्रकरणात मंदार मुख्य आरोपी होता. याच जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनास्थळावरून पोलिसांनी दोन पिस्तुले जप्त केली आहेत. पुणे शहराचे पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन यांनी संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना केल्याची माहिती दिली आहे.
मात्र, शिवाजीनगर न्यायालयासारख्या संवेदनशील परिसरातच असा जीवघेणा हल्ला झाल्याने पुण्यातील न्यायालयीन सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.





