पुणे कोर्टात भरदिवसा गोळीबार! प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची हत्या; न्यायालयातच रक्ताचा थरार!
जिल्हा न्यायालयाच्या आवारात भरदिवसा गोळीबार! प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची निर्घृण हत्या करण्यात आली असून न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
पुणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात, गेट क्रमांक ४ समोरील फॅमिली कोर्टच्या प्रवेशद्वाराजवळ भरदिवसा गोळीबार करून एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची हत्या करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका खून प्रकरणात साक्ष देण्यासाठी आलेल्या साक्षीदारावर त्याच खटल्यातील आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती आहे. एवढंच नाही, तर धारदार शस्त्रानेही त्याच्यावर वार करण्यात आल्याचं समोर येत आहे. या हल्ल्यात आणखी एक व्यक्ती जखमी झाली असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच शिवाजीनगर न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर आता न्यायालयाच्या आवारातच हत्येची घटना घडल्याने पोलीस प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
न्यायालयात साक्ष देण्यासाठी येणारा साक्षीदारच सुरक्षित नसेल, तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
या घटनेचा सखोल तपास करून आरोपींना कठोर शिक्षा देण्यासह पुण्यातील सर्व न्यायालयांच्या सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट करण्याची मागणी होत आहे.





