“मंत्र्यांच्या दबावामुळे आमचे फॉर्म घेतले नाहीत!” | विजय पाटकरांचा चित्रपट महामंडळावर गंभीर आरोप

Rokhthok Maharashtra 3 0

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी थेट राजकीय दबावाचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
तब्बल दहा वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज मुद्दाम भरू दिला गेला नाही, असा आरोप पाटकरांनी केला आहे. त्यांनी महामंडळाचे मावळते अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि एका मंत्र्यांच्या OSD वर नाव न घेता निशाणा साधला.
“महामंडळाचं अक्षरशः थडगं करून ठेवलंय… कर्मचाऱ्यांना सात-सात महिने पगार नाही… आणि आता राजकारण करून फॉर्म रोखले जात आहेत,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
पाटकरांचा दावा आहे की, ते स्वतःचं पॅनल उभं करतील या भीतीने त्यांचा फॉर्म कोल्हापूरपर्यंत पोहोचू दिला गेला नाही. अभिनेत्री क्रांती रेडकर आणि निशिगंधा वाड यांच्यासोबतही असंच घडलं असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, या निवडणुकीत कोल्हापूर विरुद्ध मुंबई-पुणे अशी लढत रंगणार असून ७ जूनला मतदान आणि ८ जूनला निकाल जाहीर होणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.