कीर्तनावरून परतताना काळाचा घाला! आजीसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आंबळे गावात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम संपवून घरी परतणाऱ्या चौघांना भरधाव अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली.
गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी रात्री न्हावरे-शिरूर रस्त्यावरील केसरी हॉटेलसमोर हा भीषण अपघात झाला.
या अपघातात कौशल्या वसंत झेंडे (वय ६१), सोहम राजीव झेंडे (वय १३) आणि आरुषी दत्तात्रय झेंडे (वय ११) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ज्योती राजीव झेंडे (वय ४२) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धडक इतकी भीषण होती की सोहम आणि आरुषी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर आजी कौशल्या झेंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने आंबळे गावावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.





