सातबाऱ्यावर नोंदीसाठी ३ हजारांची लाच! तलाठ्याला दोन वर्षांचा कारावास
सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी तीन हजारांची लाच मागितली; नांदेडमधील तलाठ्याला दोन वर्षांचा कारावास!
नांदेड जिल्ह्यातील लाचखोर तलाठ्याला अखेर न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. शेतजमिनीचा फेरफार करून सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला दोन वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
संजय गजानन मेहुनकर असे दोषी तलाठ्याचे नाव आहे. ते हिमायतनगर तालुक्यातील खडकी बाजार सजामध्ये तलाठी म्हणून कार्यरत होते.
खडकी येथील विठ्ठल काशिनाथ नरखेडे यांनी त्यांच्या आईच्या नावाने शेतजमीन खरेदी केली होती. या जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी मेहुनकर यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. २५ मे २०१५ रोजी त्यांनी ही रक्कम स्वीकारली होती.
यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि भोकर येथील अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालयात खटला चालला.
सरकारी अभियोक्ता अनुराधा डावकरे यांनी बाजू मांडली. अखेर न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तलाठ्याला दोन वर्षांच्या कारावासासह २० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
सरकारी कामासाठी लाच मागणाऱ्यांना न्यायालयाचा स्पष्ट इशारा मिळाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.





